Vayam effect!

परत लाच घ्‍यायची हिंमत राहिली नाही…
बोरीचाघोडा म्‍हणून आपले एक गाव आहे. तिथला ग्रामसेवक महाभ्रष्‍ट आणि राजकीय दादा आहे. गरीब लोकांना घर बांधण्‍यासाठी सरकारकडून 35हजार अनुदान मिळते. असे अनुदान देताना हा ग्रामसेवक 10हजार रूपये खात असे. घरांना कायदेशीर मान्‍यता मिळण्‍यासाठी घरपट्टी भरून पावती फाडावी लागते. अशी पावती मिळण्‍यासाठी ग्रामसेवकाला एक कोंबडी द्यावी लागत असे. आपल्‍या वयम् चळवळीत हे गाव सहभागी झाल्‍यानंतर लोकांनी रोजगारहमीच्‍या अर्जाची पावती मिळवण्‍यासाठी त्‍याला हैराण केले. त्‍याने पावती दिली नाही, म्‍हणून लोकांनी तहसिलदाराकडे लेखी तक्रार केली. तहसिलदाराने सज्जड दम दिल्‍यावर पावत्‍या मिळाल्‍या. इतकेच नव्‍हे, तर आपल्‍या कार्यकर्त्‍याचे जेव्‍हा घराच्‍या अनुदानाचे प्रकरण आले, तेव्‍हा ग्रामसेवकाने एक पैसाही न खाता सर्व रक्‍कम त्‍याच्‍या हातात ठेवली. चार जणांच्‍या घरपट्टीच्‍या पावत्‍या दोन वर्षं रखडल्‍या होत्‍या, त्‍याही बिनकोंबडीच्‍या मिळाल्‍या!!
वयम् च्‍या शिबीरात बोरीच्‍याघोड्यातले दोघे जण आले होते. तेव्‍हा त्‍यांना ग्रामसेवकाचीच भीती खूप होती, आता ते तहसिलदाराशीही न घाबरता बोलू शकतात. आपण नागरीक आहोत, पालापाचोळा नाही. आणि दुसरं म्‍हणजे आम्‍ही एकटे दुकटे नाही… आमचा 33 घरांचा पाडा एकजूट आहे. – या जाणिवांचीच ही जादू आहे.

लोकांनी जंगलतोड रोखली
हातेरी गावाच्‍या जंगलातून बाहेरचे लोक ट्रॅक्‍टर भरून लाकडे तोडून नेत असत. कोकणपाडा आणि हातेरीतल्‍या वयम् च्‍या कार्यकर्त्‍यांनी वनाधिकार कायद्याचा बडगा दाखवून ही लाकूडतोड बंद केली आहे. वनखात्‍याच्‍या कर्मचा-यांनाही गावक-यांनी सांगितले आहे, ”आम्‍ही इथून एकही गाडी जाऊ देणार नाही. ही लाकूडतोड अवैध आहे. एखादा ट्रॅक्‍टर जात असेल, तर आम्‍ही तुम्‍हाला कळवू. तुमच्‍या खात्‍याने जर त्‍वरित कारवाई केली नाही, तर आम्‍हीच कारवाई करू. आणि जर तुम्‍ही यात सहकार्य करणार नसाल, तर तुमच्‍याही गाड्या इथे फिरू देणार नाही.” ट्रॅक्‍टरवाल्‍यांनी वनखात्‍याला याबद्दल विचारले, तेव्‍हा खात्‍याने त्‍यांना सांगितले, ”तुम्‍ही हातेरीच्‍या ग्रामस्‍थांना विचारा, त्‍यांनी नेऊ दिले तरच लाकडे नेता येतील.” ट्रॅक्‍टरवाल्‍यांनी फिरकणेच बंद केले आहे. अर्थात, आत्‍ताही गरजू माणसाला डोक्‍यावरून लाकडे वाहून नेण्‍यास गावाची पूर्ण परवानगी आहे. याच पध्‍दतीने हातेरीच्‍या नदीतली वाळूही बाहेरच्‍या कंत्राटदारांना देण्‍यास लोकांनी मज्‍जाव केला आहे. तसा बोर्डही नदीच्‍या पुलावर लावला आहे.
वयम् च्‍या शिबीरात कायदे शिकल्‍याचा उपयोग असा होत असतो.
तेवढं एक सांगा म्‍हटलं तर हे मिळालं
गेल्‍याच महिन्‍यात त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात आपले काम सुरू झाले. तिथल्‍या काही तरूणांनी जव्‍हारमधले वयम् चे काम पाहिले, गावातल्‍या लोकांकडून माहिती घेतली, आणि मग आमच्‍याकडेही हे काम करूया असे त्‍यांनीच ठरवले. खरशेत ग्रामपंचायतीतल्‍या या तरूणांनी वयम् च्‍या नाशिक टीमशी संपर्क साधला आणि आपल्‍या गावात दोन दिवसाचे एक शिबीरच ठरवले. शिबीरात पाच पाड्यांतले मिळून 13 तरूण होते. त्‍यांनी वयम् ची त्र्यंबक शाखा सुरू केली. लोकांनीच वयम् चे काम scale up करण्‍याची ही दुसरी घटना.
आज सावरपाडा गावात पहिली मासिक बैठक झाली. तिथे रघुनाथ वळवी या तरूण कार्यकर्त्‍याने एक अनुभव सांगितला. रोजगारहमीयोजनेत गावात झालेल्‍या कामांची मजुरी लोकांना तीन महिने होऊन गेले तरी मिळाली नव्‍हती. रघुनाथ आणि इतर काही तरूणांनी संबंधित खात्‍याच्‍या अधिका-यांना भेटून या कामाची ‘मोजमाप नोंदवही’ (एम् बी) बघायला मागितली. ही वही बघितली की, कोणाच्‍या नावे किती काम नोंदवले आहे आणि किती मजुरी देणे आहे हा सर्वच खुलासा होतो. प्रशासनातले लोक जी काही गडबड करायची ती या वहीतच करतात. या तरूण पोरांनी ‘एम् बी बघायची आहे’ अशी मागणी करून वर कायद्यातल्‍या कोणत्‍या कलमाप्रमाणे ही वही बघण्‍याचा अधिकार आहे, हेही त्‍या अधिका-यांना ऐकवले.
त्‍यानंतर ही वही देण्‍याऐवजी तुमची मजुरी ताबडतोब तुमच्‍या खात्‍यात जमा करतो, असे आश्‍वासन अधिका-यांनी दिले. शुक्रवारी एम् बी मागितली, आणि मंगळवारी सर्व मजुरांच्‍या खात्‍यात मजुरी जमा झालेली होती. दोन पाड्यातल्‍या लोकांना मिळून साठ हजार रूपये मजुरी लाभली.
या अनुभवावर खूश होऊन रघुनाथ म्‍हणाला, ‘तेवढं एक एम् बीचं सांगा म्‍हटलं, तर हे मिळालं बघा’!!
जंगल सांभाळण्‍याचे लोकांचे प्रयत्‍न…
कोकणपाडा गावातल्‍या वयम् च्‍या मंडळाने गेल्‍या वर्षीपासून जंगल सांभाळण्‍याची चळवळ सुरू केली आहे. गावाशेजारच्‍या वैशाखआंबा आणि मालचेडा या डोंगरांवर गावक-यांनी कु-हाडबंदी केली आहे. तिथली झाडे, झुडपे, छोटी रोपे यांना गावाचे संरक्षण आहे. झाडांना चांगला फुटवा यावा, यासाठी कोकणपाड्यातली सर्व 56 कुटुंबे श्रमदानाला उतरली आणि त्‍यांनी या झाडांची थोडी छाटणी करून त्‍यांना माती-दगडाची भरही घातली.
आपले जंगल कायद्यानेही आपले असले पाहिजे, यासाठी वनाधिकार कायद्याप्रमाणे सामुहिक वन हक्‍काचा दावा करण्‍यासाठी आता लोक सरसावले आहेत. यातली पहिली पायरी म्‍हणून गावातल्‍या तरूणांनी पुढाकार घेऊन People’s Biodiversity Register (पीबीआर, लोकांचे जैवविविधता नोंदणीपुस्‍तक) तयार केले आहे.
यात गावाच्‍या जंगलात आढळणारी 84 मोठी झाडे, 62 प्रकारची झुडपे, 27 वेली, 14 पाणवठे, पाण्‍यात मिळणारे 12 प्रकारचे मासे, अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणी लोकांनी या पीबीआर मध्‍ये नोंदवले आहेत. हे सर्व टिकून रहावे, यासाठी गावाने काही कडक नियम करायचे ठरवले आहेत. त्‍या नियमांची चर्चा सध्‍या गावात चालू आहे.
वयम् चळवळ असल्‍यामुळे ripple effect नेहमीच होत असतो. आंब्‍याचापाडा आणि वाकीचामाळ या गावांनाही पीबीआर करायचा आहे, तिथे resource person म्‍हणून कोकणपाड्यातले तरूण जाणार आहेत.
Advertisements

9 thoughts on “Vayam effect!

 1. Very much encouraging. I will try to be in personal touch with Vayam group in Nasik. I will find out the team members.
  Ashok Junagade

  1. आपले स्‍वागत आहे. आमचे कार्यकर्ते श्री. मिलिंद थत्‍ते 9421564330 किंवा श्री. सुमंत जोशी 9370010424 यांना संपर्क करा. दस-याच्‍या सुमारास आमच्‍या नेतृत्‍व शिबीरात या आणि महत्‍त्‍वाचे कायदे शिकून घ्‍या.

 2. milind sir; mi tumcha oxygen mathe (dar kasaln atta boluch ki thet) lekh vachala ani mala to khup awadla o malahi watle ki mi hi tumchy mohim mathe samil vyave . mala pan aplya navin ainary shibira mathe mala samil karave hi nmbra vinanty ( raju haribhau sultane nutan colony new bhokardan. at bhokardan dist jalna mob no ; 9970312886

  1. नमस्कार राजू,
   पुढच्या शिबिराला अवश्य या. शिबिराची माहिती या ब्लाॅगवर मिळेलच. शिवाय
   फेसबुकवर VayamIndia हे पान अवश्य पहा.
   On 29 Apr 2015 16:31, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

 3. आपल्या चळवळी बद्दल लोकमत मध्ये नेहमी वाचतो . मी एक शेतकरी असून पर्यावरण पूरक शेती करतो .तसेच ग्राहक पंचायत च्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या , शेतकर्यांचे इले, समस्या सोडवण्याचे सामाजिक भावनेतून प्रयत्न करत आहे . आपल्या शिबिरात येऊ इच्शितो .तरी मार्गदर्शन करावे.
  जयप्रकाश पाटील ,समृदी नर्सरी ,विद्यानगर गोरक्षण रोड अकोला . ९८२३१०२३१०
  श्री थत्ते सरांचे लेख खूप अभ्यासपूर्ण व वास्तवाला धरून असतात .त्यांच्या सोबत संपर्क साधण्या करिता मोब. नं द्यावा. ही विनंती .

  1. नमस्कार जयप्रकाशजी, मिलिंद थत्ते यांचा मोबाईल नं 9421564330 आहे.
   On 3 May 2015 15:02, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s