jawhar chronicles: “आम्ही तुला राखू, तू आम्हाला राख”

मित्रहो, आत्ताच्या जव्हार भेटीत काय काय झालं, हे थोडं विस्ताराने (अघळपघळ पाल्हाळ) तुम्हाला सांगावं असं वाटलं, यातून अनेक गोष्टींची कल्पना येइल. आपलं वास्तवाचं भान वाढेल. ज्या गोष्टी ‘रिपोर्ट’ म्हणून लिहिताना सांगितल्या जात नाहित, त्या लिहितो आहे…

 – – –

मागच्या अठवड्यात शैलेश (सहकुटुम्ब) आणि मी-विनायक-प्रकाश मिळून सर्व गावात रोपं पोचवून आलो. आत्ता पुन्हा फेरी झाली. उद्देश होता : रोपं सगळ्यान्नी लावली का हे बघणे, प्रत्येक कुटुम्बात ओळख करून घेणे, आणि रोपांविषयी आस्था रूजवणे. दीपालीनी सुचवलं, की आपण पूजा करू. निसर्ग-पूजा ही आपली सर्वांची परंपरा आहे. त्यामुळे अशा पूजेला विधी अगदी सोपा होता.

“तू सुगंधी आहेस, तू बहु अन्न देणारी आहेस, आम्ही तुझ्यावर नांगर धरीत नाही, तरी तू आम्हाला तारतेस.

“कनसरीला नमन, धन्तरीला नमन, नदीला नमन,

“ॐ द्यौ: शान्ति:, अन्तरिक्ष: शान्ति:, पृथिवी शान्ति:, आप: शांति:, वनस्पतय: शान्ति:, ओषधय: शांति:, सर्वं शांति:, ॐ शांति: शांति: शांति:

“हे वनस्पति, तू औषध देऊन आमच्या घरातल्या सर्वांचे आरोग्य चांगले ठेव. “आम्ही तुला राखू, तू आम्हाला राख”

ही सर्व प्रार्थना उपस्थित सर्वांनी म्हणायची होती. आणि ती सगळ्यान्ना रुचत होती. रुइच्या पाड्यात ही प्रार्थना म्हणताना तिथले मोठे भगत बाळू धाकु पुढे आले. त्यांना हा कार्यक्रम फार आवडला. पूजेनंतर त्यांनी आम्हाला जवळ जवळ मिठीच मारली होती. ते प्रत्येक घरी आमच्या बरोबर आले, आणि पूजेत सहभागी झाले. या बाळू बाबाकडे दूर-दुरून लोक येतात… तो मूल होण्यासाठी औषध देतो. रूइचा पाडा हे तसं फार विचित्र गाव आहे. कुठलीही संस्था इथे काहीही करू शकलेली नाही. इथले बहुतेक लोक ठाकुर जमातीचे आहेत. शिक्षणाचे प्रमाण खूप कमी. दारू गाळणे हा मोठा धंदा. गावात पिणारे बरेच. आजू-बाजुच्या पाड्यातले लोक इथे येऊन पितात. इथल्या बैठकांमधुन रामू गवते अणि ताई-बाई ही दोन माणसं हाताला लागली. ताई-बाईने सांगितलं, “आम्ही ३ जणी रोपं घेऊन इथे आलो. तर या कोनी घेइनात. मग मी इथे उभी राहून जाम शिव्या दिल्या. तुमच्या दाराशी येऊन आम्ही औषधं देतुय, तुम्हाला अकल नाही का? बराच वेळ बोललू तहां आल्या बायका…”

हातेरीत भास्कर नव्हता, त्याच्या आई-वडिलांनी पूजा केली. ते अगरबत्ती विकत घ्यायला चालले होते. त्यांना अडवून विनायकने “घरात जे असेल त्यानेच पूजा करायची” असं सांगितलं. मग नुसत्या हल्दीने झाली पूजा! हातेरी, कोकणपाडा, कोगदा, वाकिचामाळ, वेलीचा पाडा, वडपाडा या सर्वच ठिकाणी लोकांनी वाडी करून भाजीपाला लावला होता. तिथेच औषधि झाडं पण लावली होती. वडपाड्यात एक बेवडा आमच्या मागे लागला. “हे कुठलं झाड़ आहे” म्हणाला. “हातगा” सांगितल्यवर तो म्हणाला, “हट, याची पूजा नसते करायची. वड-पिम्पलाची पूजा केली तर ठीक आहे. हे झाड़ काय कामाचं नाय. तुम्ही लोक गरिबाला पूजा करायला लावता, फसवता. तू कुठला रे?” विनायक म्हणाला, “मी इथलाच आहे. दापटिचा.” “हां, काय पगार मिळतो तुला?” “काही नाही.” “मग कशाला करतोस हे भीक मागायचे धंदे?, माझ्याकडे बघ. मी खाडीत बुडून रेती काढायचा काम करतो. दिवसाला हजार रुपये कमावतो. माझ्या बरोबर चल.” असे दारूडे आडवे येणे आम्हाला नवीन नव्हते. आम्ही थंड होतो. विनायक त्याला म्हणाला, “तुझं काम आम्हाला जमणार नाही बाबा. आता तुझ्याकडे खूप पैसे असतील ना? मग तू का असा फाटका राहतोस?” मग तो कुजबुजला,” अरे, तिकडे कमावून आलो, की जव्हारलाच माझे ३-४ हजार रुपये खर्च होतात. मस्त क्वार्टरची दारु पितो… मग पैसे उरतच नाहीत ना! आता काही शिल्लक नाही. आता तू दे ना मला १० रुपये.” विनायकने हात वर केल्यावर त्याने माझ्याकड़े बघून विनायकला विचारलं, “हा कुठला?” विनायक म्हणाला, “तो माझा भाऊ आहे. आम्हा थालकरापैकीच आहे तो. दापटीलाच असतो.”

प्रकाश बरफच्या गावात म्हणजे कोगद्यात बरीच खळ्बळ होती. त्यांचा ४ दिवसाम्पुर्वी फ़ोन होता. “आमची भात, नागली मरणार औंदा. आम्ही मोर्चा काढू का? कलेक्टर ऑफिसला जाऊ दुष्कालाची मागणी घेउन. आम्ही निवेदन पण लिहून काढलंय. २०० लोकांचे अंगठे, सह्या घेतल्यात..” मोर्चा काढण्याआधी आपण गावातच एक सभा घेऊ, असं ठरलं. सभेला २ पाड्यतले मिळून अदमासे १०० लोक होते. इतके लोक कधीच जमत नाहीत. सभेपुढे मी बोलावं असं ठरलं. मी बोललो – “आत्तापर्यंत लाल बावट्याचे मोर्चे झाले, आता इतर पक्षांचे होतील, ते लोक ३-४ हजार मानसं ट्रक भरून आणतात, तरी काही होत नाही. आपण १०० मानसं जाऊन काय होणार. कशाला भीक मागायची? आपण ज्या गोष्टीचे मालक आहोत, ती कायद्याने लढून मिळवुया. ८० वर्षांपूर्वी ‘फारेष्ट’ आलं. त्याच्या आधी जंगल कोणाचं होतं? आपलंच ना? आता सरकारने नवीन कायदा केला, आपली माफी मागितली, आणि आपलं जंगल आपल्याला परत देऊन टाकलं. त्या जंगलात काम मिळण्यासाठी आपण भीक मागायची? आपण आपली ग्राम पंचायत निवडून देतो ना? मग पहिलं त्या पंचायतीला काम करायला लावुया ना! रोजगार हमी कायद्यानुसार आपण मागितल्यावर १५ दिवसात ग्राम पंचायतिने काम दिलेच पाहिजे. आपण सगळे नमूना क्र. ४ भरुया. त्यावर ग्रामसेवक आपल्याला तारीख घालू देत नाही. ती पण घालुया. १०० लोकांनी ग्राम पंचायत ऑफिस वर जा. अर्ज द्या. आणि ‘पोच’ द्यायला ग्रामसेवकाला भाग पाडा. सत्ता आपली आहे, कुठल्या पार्टीची नाही की कुठल्या एका व्यक्तिची नाही. आपल्याला पोहायचं असेल, तर हात-पाय कोणी मारले पाहिजेत? आणि जो हात पाय मारत नाही त्याचं काय होतं? तुम्ही नमूना क्र. ४ ची लढाई सुरु करा. कुठे अडचण आली, तर आम्ही आहोत.” सभेनंतर जयराम च्या घरी क्र. ४ घ्यायला बरेच लोक आले होते.

हाडा म्हणून एक दुर्गम गाव आहे जव्हारच्या दक्षिणेला. पक्का रस्ता त्या गावापासून ४-५ किमी दूर आहे. तिथल्या एक मित्राने विनायकला फ़ोन करून बोलावलं होतं, “आमच्याकड़े वनाधिकार ची माहिती द्यायला या”. जाणं भागच होतं. आज सकाळीच मी, विनायक, प्रकाश तिथे ट्रिपल सीट गेलो होतो. तो मित्र गावात नव्हता. त्याचे वडील होते. आम्ही अमुक विषयावर बोलायला आलो होतो, आत्ता गावातले काही जण जमतील का, असं प्रकाश ने त्यांना विचारलं. त्यांनी गावातली १०-१५ तरूण पोरं गोळा केली. त्यांच्याशी आम्ही बोललो. “तुमच्या पैकी किती जणांना नोकऱ्या आहेत? कोणालाच नाही ना? मग औंदा तुम्ही खाणार काय? कुठली पार्टी देणार आहे खायला? काम कुठे शोधणार आहात? रोजगार हमी कायद्याप्रमाणे गावातच आपण मागू तेंव्हा काम मिळालं पाहिजे, हे माहीत आहे का? काम देणं ही ग्राम पंचायतीची जबाबदारी आहे. पण आपल्याला हे माहितच नसतं…”

समोर बसलेल्या तरूणंपैकी एक महेश म्हणाला, “आपल्याला ते लोक माहीत होउच देत नाहीत ना! आम्हाला मजूरी कमी देतात म्हणून मी दर वर्षी भांडतो. पण ते आम्हाला ऐकत नाहीत. मी वन विभागावर माहितीचा अर्ज पण टाकला होता. पण त्यांनी अर्ज स्वीकारला नाही. वर त्यांचे एकमेकाशी सम्बन्ध असतात ना? मग ते दबाव टाकतात.” तो एवढ्या तिडकीने बोलल्यावर प्रकाश ने अडवलं, “तुझं पुढे काय झालं, ते मी सांगतो. त्यांनी गावातल्या लोकांना भडकवलं असेल तुझ्यावर, याने अर्ज केला म्हणून तुमची कामं थांबली असं सांगितलं असेल. तुझ्या घरी येऊन फारेष्टच्या मुकादम लोकांनी दम दिला असेल.” महेश मान डोलावत म्हणाला, “हो ना, आणि मग मी एकटा पडलो.” प्रकाश त्याला धीर देत म्हणाला, “माझं पण असंच झालं होतं. मी पण माघार घेतली होती. आत्ता ६ महीने प्रयत्न करून आमच्या कड़े पहिली सभा झाली आणि लोक एकजुट उभे राहिले.” विनायक म्हणाला, “माझा पण असाच अनुभव आहे. माझ्या घरावर तर लोकांनी दगडा पण मारली होती. आपल्याला आपला समाज बदलायचा असेल, तर असं सहन करावंच लागेल. पण आता आपण एकेकटं लढन्याची गरज नाही. आपण एकमेकांना मदत करू. त्या साठी एकत्र आलं पाहिजे. कायदा नीट शिकून घेतला पाहिजे.”

मी म्हणालो, “महेश, अरे आपण शिवाजीची मानसं. शिवाजीनी डायरेक्ट औरंगजेबावर लढाई केली होती का?” आता महेश ला ज़रा हसू आलं, दोघा-तिघांनी मान डोलावली. “एकदम तालुका पातळीवर नाही जायचं झगडाय्ला. आपण आताच्या दुष्कालावर गावातच काय करू शकतो, ते आधी ठरवुया. ग्राम पंचायतीला काम करायला लावुया. मग पुढचं बघू. ” विनायक ने शेवटचा खडा टाकला, “३१ च्या सोमवारी आपली बैठक आहे ग़ोर्ठण गावात. १० गावातले लोक येणार आहेत. तिथे या तुम्ही. कोणा कोणाची यायची इच्छा आहे, नावं द्या” ४ जणांनी नावं दिली. हे एक गाव झालं. विनायक आणि प्रकाश पुढच्या ३ दिवसात आणखी बरीच करणार आहेत.

– – मिलिंद Milind

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s