सरकारच्या मनमानी ‘धरण’शाहीला विरोध करण्यास जव्हारचे आदिवासी सज्ज

खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समिती – प्रेस नोट दि. 30 मे 2012, जव्‍हार (जि.ठाणे)

मुंबईला 2025 साली औद्योगिक व घरगुती वापराचे पाणी कमी पडू नये, म्‍हणून आमच्‍या गावांचा बळी देण्‍याला आमचा विरोध असल्‍याचे खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समितीने म्‍हटले आहे. प्रस्‍तावित खरगी-हिल धरणाच्‍या संभाव्‍य बुडीत क्षेत्रात येणार्‍या आदिवासी गावातील ग्रामस्‍थ काल 29 मे रोजी पवनमाळ गावात एकत्र आले व सर्व गावांनी मिळून धरणाला विरोध करण्‍यासाठी खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समितीची स्‍थापना केली. सरकारने प्रत्‍येक गावातल्‍या ग्रामसभेशी बोलले पाहिजे आणि ग्रामसभेच्‍या निर्णयाचा मान ठेवला पाहिजे, अशी मागणी या सभेत लोकांनी केली. जी काही चर्चा करायची, ती खुल्‍या ठिकाणी ग्रामसभेशीच झाली पाहिजे. बंद खोल्‍यांमध्‍ये बसून लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांनी केलेल्‍या वाटाघाटी आम्‍ही स्‍वीकारणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. आमचे आयुष्‍य, आमच्‍या जमिनी, जंगल, आणि संस्‍कृती यांचे भविष्‍य ठरवण्‍याचा अधिकार ग्रामसभेखेरीज कोणालाही नाही, असेही समितीने म्‍हटले आहे.

खरगी-हिल धरण हे दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्‍पातील तीन धरणांपैकी एक आहे. मुंबईची 2025 सालातील औद्योगिक व घरगुती पाण्‍याची अंदाजित गरज पुढे करून सरकारने ही धरणे बांधण्‍याचे ठरवले आहे. बुडीत क्षेत्रात असणारी आदिवासी गावे आजही पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी झगडत असताना, शेतीच्‍या पाण्‍यासाठी आत्‍महत्‍या करत असताना मुंबईला मात्र तेरा वर्षांनी पाणी कमी पडू नये याची काळजी सरकार करते आणि त्‍यासाठी आमचीच गावे बुडवते ही एक क्रूर चेष्‍टा आहे, अशी भावना संघर्ष समितीत सहभागी झालेल्‍या गावांनी व्‍यक्‍त केली आहे. ढाढरी, कोकणपाडा (हातेरी), रुईपाडा, खर्डी, खरपडपाडा, व पवनमाळ या गावांनी सरकारच्‍या या अन्‍याय्य प्रकल्‍पाला विरोध करण्‍याचा निर्धार करून खरगी-हिल धरण विरोधी संघर्ष समितीचे गठन केले आहे.

संघर्ष समितीचे संयोजक आणि हातेरी गावचे रहिवासी विनायक थाळकर या सभेत बोलताना म्‍हणाले, की सरकारच कायदेभंग करत चालले आहे. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 (कलम 54) आणि आदिवासी स्‍वशासन (पेसा) कायदा 1996 (कलम 4) यांचा उल्‍लेख करून थाळकर म्‍हणाले, की दोन्‍ही कायद्यानुसार सरकारने प्रकल्‍पाआधी ग्रामसभेशी बोलणे बंधनकारक आहे. पण सरकारने मात्र सरपंच, राजकीय नेते, आणि आमदारांच्‍या गुप्‍त बैठका बोलावून जनतेपासून धरणाची माहिती दडवून ठेवली आहे. सरकारच्‍या या बेकायदेशीर कारवाया आम्‍ही आमच्‍या गावात चालू देणार नाही. आमच्‍या मुंबईच्‍या भाऊबंदांप्रमाणेच आम्‍हीही देशाचे नागरिक आहोत, याचे भान ठेवून सरकारने आम्‍हाला आदराने वागवावे, अशी मागणी थाळकर यांनी केली. उपस्थित ग्रामस्‍थांनी या मागणीस जोरदार समर्थन दिले.

ढाढरी गावचे एक रहिवासी आशिष अकणे यांनी सभेत सांगितले की, माहिती अधिकारात माहिती मागूनही सरकारने अपर जिल्‍हाधिकारी कार्यालयात घेतलेल्‍या पुढार्‍यांच्‍या बैठकीचे इतिवृत्‍त आम्‍हाला दिले नाही. आमचे घरांचे-जमिनींचे काय होणार, याची माहिती आमच्‍यापासूनच दडवून ठेवणारी ही लोकशाही आहे की धरणशाही, असा संतप्‍त सवाल सभेतल्‍या तरुणांनी विचारला.

संघर्ष समितीचे सह-संयोजक दीपक माडी यांनी प्रकल्‍पाच्‍या ‘फीजिबिलिटी स्‍टडी रिपोर्ट’चा उल्‍लेख केला. या रिपोर्टनुसार बुडत्‍या जमिनीचा मोबदला म्‍हणून हेक्‍टरी 23 हजार रूपये देण्‍यात येणार आहेत. आमच्‍या गावांमध्‍ये फार थोडे लोक मालकी जमिनी असणारे आहेत, बहुसंख्‍य लोकांकडे वन हक्‍क कायद्यानुसार मिळालेले पट्टे आहेत. त्‍यांना तर हा भुक्‍कड मोबदलाही मिळणार नाही. ही माहिती माडी यांनी सांगताच सभेने जोरदार निषेध केला. आमच्‍या लोकांना शेतीशिवाय कोणते कौशल्‍य अवगत नाही, आम्‍ही हा दीडदमडीचा मोबदला घेऊन कुठे जायचे, कसे जगायचे – असा प्रश्‍न सहभागी ग्रामस्थांनी विचारला.

प्रत्‍येक गावातील एका प्रतिनिधीने आपले विचार मांडले आणि सर्वांनी धरणाला विरोध करण्‍याच्‍या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले. ढाढरी, कोकणपाडा, रुईपाडा, खर्डी, खरपडपाडा, पवनमाळ या गावांमधील स्‍त्री-पुरूष प्रतिनिधी निवडून संघर्ष समितीचे गठन करण्‍यात आले. 

Image
Sangharsh Samiti meeting at village Pawanmal

सभेला सर्व गावांमधून पायी चालत आलेले 250 ग्रामस्‍थ उपस्थित होते. मुंबई व नाशिकहून ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्तेही या संघर्षाला पाठिंबा देण्‍यासाठी हजर होते. 

Advertisements

2 thoughts on “सरकारच्या मनमानी ‘धरण’शाहीला विरोध करण्यास जव्हारचे आदिवासी सज्ज

  1. मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मी तुमच्या बरोबर आहे. मला काही करता येण्याजोगं असेल तर सांगा… अनिल शिदोरे … anilshidore@gmail.com

    1. तुम्‍ही सोबत आहात, छान वाटलं.
      ‘तुमच्‍या जोगं’ काही काम काढतो आणि नक्‍की कळवतो,
      – मिलिंद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s