वयम् चळवळीच्या आठव्या वर्षाखेरीची बित्तंबातमी आणि तिळगूळ

जनविश्‍वास

डोयाचापाडा या गावातला एक प्रसंगः शांतारामच्‍या पडवीत भरलेली दर बुधवारची गाव बैठक. गावाच्‍या सामुहिक वनहक्‍क व्‍यवस्‍थापन समितीचा अध्‍यक्ष कृष्‍णा तुंबडा निवेदन करतोय, ‘‘आपल्‍या जंगलाच्‍या बचावासाठी आपण जे दगडी बांध घालतोय, त्‍याचं काम पूर्ण होत आलंय्. या वेळच्‍या मोजमापाप्रमाणे सहा दिवसाची सर्वांची मिळून मजुरी चाळीस हजारच्‍या वर आहे. एकेका दिवसाची चारशे रूपयापेक्षा जास्‍त पडतेय्. काम भरपूर केलंय् सर्वांनी, पण आपण एकाच मस्‍टरात एवढे संपवले तर जंगलाचं कुंपण पूर्ण करायला पैसे पुरतील का? आपले वयम्’चे पैसे एवढ्या कष्‍टाने उभे रहतात, ते मध्‍येच संपले तर कसं करायचं?’’ पुढे बरीच चर्चा झाली. वयम्’चे कार्यकर्तेही बैठकीत आले. त्‍यांच्‍यासमोर ही चर्चा झाली. शेवटी लोकांनी ठरवलं, दिवसाचे 440 रू. पडतायत, पण आपण आत्‍ता 350 रूपयेच घेऊ. बाकीचं आपल्‍या श्रमदानात धरू.

पुण्‍याच्‍या सायबेज आशा ट्रस्‍टने डोयाच्‍यापाड्याला जंगल संरक्षणासाठी दगडी बांध, गुरे प्रतिबंधक चर आणि पाऊसपाणी टाक्‍या इ. कामांसाठी सहा लाख रूपये देऊ केलेत. गावातल्‍या सर्वांना हे माहीत आहे. सारा हिशोब त्‍यांच्‍यासमोरच केला जातो. केलेल्‍या कामाची मोजणी, नोंद आणि मजुरीचे गणित हे सर्व गाव-समितीचे तरूण सदस्‍य वयम्’च्‍या मदतीने करतात. उपलब्‍ध पैशात आपल्‍या गावाचे आपल्‍या जंगलाचे काम पूर्ण झाले पाहिजे, यासाठी लोकांनी आपल्‍या कष्‍टाचे पैसे सोडल्‍याचे हे एक उदाहरण! असा जनविश्‍वास हा वयम्’च्‍या कामातला आणि कार्यशैलीतला अभिमानाचा भाग आहे

सामुहिक वन हक्‍कांची नांदी

 

 

 

गावाजवळ असणारे जंगल लोक वापरत असतात, पण त्‍यावर त्‍यांचा हक्‍क नसतो आणि ते राखण्‍याची जबाबदारीही नसते. 2008 साली आलेल्‍या कायद्याने यात मोठा बदल केला. 150 वर्षांपूर्वी इंग्रज सरकारने हिरावून घेतलेले जंगलावर आधारित उप‍जीविकेचे हक्‍क लोकांना पुन्‍हा मिळणार आहेत. (या संदर्भात अधिक माहितीसाठीः http://m.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=2064 ) अर्थात हे हक्‍क अजून प्रत्यक्ष मिळण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागत आहेत. पालघर जिल्‍ह्यातले पहिले सामुहिक वन संसाधन हक्‍क वयम्’च्‍या गावांनी मिळवले. जव्‍हार तालुक्‍यातील हातेरी-कोकणपाडा (22 हे. वनक्षेत्र), आकरे-आंब्‍याचापाडा (60 हे.), ढाढरी (284 हे.) आणि विक्रमगड तालुक्‍यातले डोयाचापाडा-कासपाडा (150 हे. वनक्षेत्र) या गावांनी जंगलावरील हक्‍क मिळवले. 2012पासून आतापर्यंत केलेल्‍या प्रयत्‍नांमुळे हे हक्‍क मिळाले.

आणखी शंभर गावांना अद्याप हे हक्‍क मिळायचे आहेत. 4 गावांना हक्‍क मिळाले, हा फार मोठा तीर नाही, पण त्‍यामुळे नांदी झाली आहे. आगे और लडाई है.

परिसर्ग संवर्धन प्रकल्‍प

Building Live Fencing Image 2.jpg

 

कोकणपाड्यात सामुहिक वन हक्‍क मिळाल्‍यानंतर जंगलाच्‍या एका भागात लोकांनी कुर्‍हाडबंदी आणि चराईबंदी केली होतीच. त्‍यावर श्रमदानही केले होते. ते पाहून एक प्रकल्‍प आपणहून चालत आला. ‘महाराष्‍ट्र जनुक कोष’ या महाराष्‍ट्र शासनाच्‍या प्रकल्‍पातला ‘परिसर्ग संवर्धन प्रकल्‍प’ कोकणपाडा या गावात वयम्, बायफ-मित्र, आणि कोकणपाडा ग्रामसभा असे तिघे मिळून चालवत आहेत. साडेपाच हेक्‍टर क्षेत्राला गुरे प्रतिबंधक कुंपण, त्‍या क्षेत्रात बांबू आणि इतर काही वनस्‍पतींची लागवड असे काम तिथे पूर्ण झाले आहे. याच गावाने जिल्‍ह्यातला पहिला PBR (लोक जैवविविधता नोंदवही) केली होती. प्रा. डी. के. कुलकर्णी यांच्‍या मदतीने या पीबीआरचे पुनर्लेखन करण्‍यात आले. 225 जातीच्‍या वनस्‍पती नोंदवल्‍या गेल्‍या.

गावातील कृषि जैवविविधता वाढावी यासाठी 22 जातींच्‍या चवळी आणि 7 प्रकारच्‍या वालाचे बियाणे लोकांना देण्‍यात आले. गावातल्‍या एका शेतात 125 जातींच्‍या भाताची लागवड प्रात्‍यक्षिकासाठी करण्‍यात आली. त्‍यापैकी स्‍थानिक शेतकर्‍यांना आवडलेल्‍या जाती आता इथल्‍या शेतीच्‍या चक्रात कायमच्‍या समाविष्‍ट होतील. पाणी व माती अडवण्‍यासाठी डोंगर उतारावर करण्‍याच्‍या कामांचे तांत्रिक प्रशिक्षण कोकणपाड्यातल्‍या निवडक तरूण-तरूणींना दिले आहे. आता पाणलोट विकासाचा तांत्रिक आराखडा बनवणे व त्‍याचे आर्थिक अंदाजपत्रक बनवणे गावाला जमू शकेल. निरगुडीचे औषधी तेल बनवण्‍याचे प्रशिक्षण महिला गटाने घेतले आहे. पहिले प्रायोगिक पाच लिटर तेल विकून झाले आहे. वयम् चळवळीचा जनविश्‍वास आणि बायफ-मित्र संस्‍थेचे तांत्रिक नैपुण्‍य यामुळे हे सारे शक्‍य झाले.

जनवन समृद्धी

डोयाचापाडा, कासपाडा, अळीवपाडा या पाड्यांना मिळून सामुहिक वनहक्‍कात 150 हेक्‍टर जंगलाची मालकी मिळाली आहे. जंगलाच्‍या काही भागात ग्रामसभेने कुर्‍हाडबंदी आणि चराईबंदी जाहीर केली आहे. गवत कापून आणायला परवानगी आहे आणि वर्षातून दोनदा सुकल्‍या लाकडांचे सरपण काढण्‍यास व डोक्‍यावरून वाहण्‍यास परवानगी आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्‍टर जंगलात नेल्‍यास कडक दंड आहे. गावातल्‍या सर्व कुटुंबांनी चुलीत जाळी बसवून त्‍यात सुधार केला आहे, त्‍यामुळे सरपणाची गरज घटली आहे. सायबेज आशा ट्रस्‍ट, पुणे या संस्‍थेने दिलेल्‍या निधीतून जंगलाला दगडी बांध आणि चर घालून संरक्षित करण्‍याचे काम आता पूर्ण होत आले आहे. 1830 मीटर लांबीचा परीघ सुरक्षित झाला आहे. जंगलाजवळ शेती असलेले शेतकरी स्‍थलांतरित होऊ नयेत, यासाठी त्‍यांच्‍या शेतात पाऊसपाणी साठवण टाक्‍या बांधून झाल्‍या आहेत. या टाक्‍यांसाठी रेती, मजुरी, दगड हा सर्व खर्च स्‍वतः शेतकर्‍यांनी उचलला आहे. जलवर्धिनी संस्‍थेने टाकी बांधकामाचे प्रशिक्षण गावातल्‍या गवंड्यांना निशुल्‍क दिले. तेथून पुढे 48 टाक्‍या लोकांनी बांधल्‍या आहेत. या पाण्‍यावर मोगरा, आंबा, काजू, व काही भाजीपाला अशी लागवडही झाली आहे. शेती आहे तोवर लोक हलणार नाहीत. शेती राखतील व जंगलही राखतील.

1465269_898574680212266_8971715561424882171_n
गावानी ठरवलेल्या चराई बंदी संबंधीचा सुचना फलक
12373277_898574533545614_9116537919103708503_n
राखीव जंगलात गुरांनी शिरू नये यासाठीचा गुरं प्रतिबंधक खड्डा  तयार करताना

जंगलात मोहाची 450हून अधिक झाडे आहेत. मोहाचे तेल काढण्‍यासाठी येथे घाणा बसवण्‍याचा प्रस्‍ताव वनविभागाने आदिवासी विकास विभागाला दिला होता. पण आदिवासी विकास विभाग ढिसाळ आणि गळका असल्‍यामुळे अद्याप हा प्रस्‍ताव मंजूर झालेला नाही. तेव्‍हा या गावात आता खासगी निधीतून फक्‍त घाणाच नाही, तर विविध वनोपज प्रक्रिया केंद्र उभे करावे असा वयम्’चा प्रयत्‍न आहे. यासाठी अंदाजे सात लाख रूपये खर्च आहे. जागा द्यायला आणि बांधकामासाठी श्रमदान करायला लोक तयार आहेत.

रोजगार हमीचा दणका

रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हा गावातल्‍या तरुणांना बलसिद्ध करणारा हुकमी एक्‍का आहे. यंदा काही गावांमध्‍ये ‘गाव प्रेरक’ म्‍हणून एकेका तरुणाला अल्‍प मानधन देऊन रोहयोचा प्रचार करण्‍यात आला. यातून झालेले काम असेः- कुंडाचा पाडा ते किन्‍हवली रस्‍ता 225 जणांना रोजगार, 50 नवीन मजूर नोंदणी, 30 जणांची नवी बँक खाती. (जेणेकरून मजुरी थेट बँक खात्‍यात जमा होईल, भ्रष्‍टाचाराला संधी नाही), आयरे गावात शेतातील मजगीच्‍या कामावर 100 मजुरांना काम, 20 नवीन बँक खाती, लोंबरपाड्यात 60 रोजगार, गेटीपाडयात 40. खैरमाळात मजगी काम, चंद्रगावात रस्‍ता, उक्‍शीपाड्यात रस्‍ता कामावर 60 जण, 10 नवीन बँक खाती. रूईपाडा रस्‍त्‍यावर 80 मजूर, 30 नवी खाती, दापटी केळीपाडा रस्‍ता 80 कामावर, 40 नवीन खाती, हातेरी गाव मजगी 100 मजूर कामावर 20 नवी खाती…

NREGA IMG1
प्रत्येक सरकारी यंत्रणेने गावात उपलब्ध कामे वाचून दाखवली… एस्टिमेट सकट. पारदर्शकतेची सवय लावण्याचा प्रयत्न.

विक्रमगड तालुक्‍यातल्‍या कार्यकर्त्‍यांनी ‘ग्राम रोजगार दिवस’चे जंगी कार्यक्रम घडवले. प्रत्‍येक कार्यक्रमाला तहसिलदार/बीडीओ व प्रत्‍येक खात्‍याचे कर्मचारी हजर होते आणि तत्‍काळ कामे करण्‍यावर भर होता. वेहेलपाडा गावात या कार्यक्रमात 51 नवीन मजूर नोंदणी, 56 जणांना जॉबकार्ड, 162 नवीन बँकखाती, रस्‍ता, विहीर दुरूस्‍ती, दगडी बांध, सीसीटी या कामांवर 5 आठवडे रोजगार मिळाला. एक बंधारा झाला, 25 हजार रोपांच्‍या नर्सरीवर 95 मजुर 2 महिने काम करत होते. धामणी गावात 200 नवी मजुरी नोंदणी, 150 जणांची काम मागणी स्‍वीकारली, 299 नवीन बँकखाती, 10 नवी जॉबकार्ड देण्‍यात आली. रस्‍त्‍यावर 7 आठवडे 65 मजूर, मजगीवर 39 मजूर, बंधारा गाळ काढणे अशी कामे झाली. बालापूर गावात 40 नवी मजुर नोंदणी, 135 नवी जॉबकार्ड, 150 बँक खाती काढून झाली. 75 जणांना काम उपलब्‍ध झाले.

जीवन शिक्षण कार्यक्रम

Life Skills
ग्राम पंचायतीची कार्यपद्धती, अधिकार आणि ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणारी कामे या विषयीची ओळख करून देताना

शाळेतल्‍या शिक्षणात रोजच्‍या जगण्‍यात उपयोगाचे क्‍वचितच काही मिळते. शालेय शिक्षणाला व्यवहार शिक्षणाची जोड मिळावी यासाठी यावर्षी प्रायोगिक स्तरावर जीवन शिक्षण कार्यक्रम मेढा-पाटीलपाडा या दुर्गम गावातल्‍या छत्रपती शिक्षण मंडळाच्‍या शाळेतल्‍या नववीच्या विद्यार्थ्‍यांसाठी सुरू केला आहे.  बँकेतून पैसे काढायचे कसे, भरायचे कसे, कर्ज कसे मिळते हे समजून घेण्यासाठी बँकेला भेट, ग्राम पंचायतीची जवळून ओळख होण्यासाठी ग्रामपंचायतदर्शन, बीज निवड व प्रक्रियेसारखी शेतीतंत्रे, स्थानिक बाजारपेठेची नव्याने ओळख असे कार्यक्रम आजपर्यंत घेण्यात आले आहेत.

या वर्षीच्या अनुभवाच्या विश्लेषणानंतर पुढील वर्षी विस्तारासंबंधी निर्णय घेण्यात येईल.

90 विद्यार्थ्‍यांसाठी एक वर्ष चालणार्‍या या उपक्रमासाठी सुमारे एक लाख रू. खर्च आहे.

देवळालीचे तिसरे वर्ष

महिंद्रा कंपनीच्‍या आर्थि‍क सहयोगाने देवळालीच्‍या वायूदल केंद्राच्‍या जमिनीवर वयम्’ने साकारलेल्‍या जैवविविधता संवर्धन प्रकल्‍पात वृक्ष लागवड केल्‍याला आता दोन वर्षे झाली आहेत. 25 हेक्‍टर क्षेत्रात लावलेल्‍या 2500 झाडांची उत्‍तम वाढ झाली आहे.

वृक्षवल्‍ली सोयरीक

आयसीआयसीआय् बँकेच्‍या आर्थि‍क सहयोगाने आणि 100 शेतकर्‍यांच्‍या सहभागाने साकारत असलेल्‍या ‘वृक्षवल्‍ली सोयरीक’ अभियानात येत्‍या वर्षात 20 प्रजातींची 40,000 झाडे लावण्‍यात येणार आहेत.

ऑक्सिजन शिबीर

लोकमतच्‍या ऑक्सिजन पुरवणीत ‘लाल दिव्‍याची गाडी तुमच्‍या दारात येतेच कशी?’ हा लेख प्रसिध्‍द झाला आणि महाराष्‍ट्रभरातून एखाद हजार तरूणांचे फोन आले. बरेचसे कौतुकाचे होते, पण काही ‘आम्‍हालाही वयम् चळवळीकडून शिकायचे आहे’ असे होते. मग लोकमत आणि वयम् संयुक्‍त विद्यमाने एक तीन दिवसीय शिबीर नाशिक येथे झाले. त्‍यात गोंदिया, अमरावती, नांदेड, सोलापूर, सांगली, नाशिक, जळगाव, आणि मुंबई अशा ठिकाणचे तरूण सहभागी झाले. त्‍यातले अनेकजण आपापल्‍या ठिकाणी आता वयम् पद्धतीने काम करत आहेत. या निमित्‍ताने बिगर आदिवासी क्षेत्रात तरुणांनी लोकशाही अधिकार वापरण्‍याचे एक नवीन गाईडही तयार झाले आहे. यात माहिती अधिकार, रेशन, वीज ग्राहकाचे अधिकार, ग्रामपंचायत व ग्रामसभेचे कामकाज असे विषय आहेत.

 

DSC_0011
राज्याच्या विविध भागातून आलेली ‘ प्रश्न पडणारी ‘तरुण मंडळी 

दैनिक लोकमतनी प्रसिद्ध केलेला शिबिराचा रिपोर्ट

स्‍मार्ट लीडर कोर्स

18 ते 25 वयोगटाच्‍या तरुणांसाठी 12 रविवार चालणारा हा कोर्सही या वर्षीच सुरू झाला. 37 ग्रामीण तरूण तरूणींनी यात प्रवेश घेतला आहे. कोर्समध्‍ये कायदे शिक्षणाबरोबरच संवाद व संघटन कौशल्याचेही प्रशिक्षण आहे.

कौतुक कमाई

वयम् चळवळीला केशवसृष्‍टी या मुंबईकर संस्‍थेने पुरस्‍कार देऊन गौरवले. चाळीस कार्यकर्त्‍यांनी मिळून हा पुरस्‍कार रंगशारदा नाट्गृहात मुंबईकरांच्‍या भरगच्‍च प्रतिसादात स्‍वीकारला.

येत्‍या वर्षात, मदतीचे हात

 1. शासनाने प्रथमच आदिवासी गावांना कोणतीही बंधने न घालता निधी दिला आहे. गावाने स्‍वतःच स्‍वतःच्‍या विकासाची प्राधान्‍ये ठरवून हा निधी वापरायचा आहे. या निधीच्‍या कुशल वापरासाठी ग्रामसभांना प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्याची गरज लागणार आहे. शासनाकडून हे काम होणार आहे, त्‍यातही वयम्’चे कार्यकर्ते सहभागी आहेतच. पण त्‍यात बर्‍याच मर्यादा आहेत. स्‍वतंत्रपणे हे काम करण्‍यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृतीच्‍या कार्यक्रमांची मालिका वयम् आखणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामागे रू. 10,000 निधीची गरज आहे. किमान 30 गावांमध्‍ये हे काम करायचे आहे. निधी आणि माणसांची उपलब्‍धता झाल्‍यास जव्‍हार आणि विक्रमगड तालुक्‍यातल्‍या सर्व 150 गावांमध्‍ये हा उपक्रम करायची आमची इच्‍छा आहे.
 2. डोयाचापाडा-कासपाडा येथील संरक्षित जंगलात पाणी व माती अडवण्‍याची कामे करायची आहेत. याचा आराखडा बनवण्‍यासाठी रू. 50,000 लागणार आहेत. आराखडा बनल्‍यानंतर पुढील कामाचे बजेट तयार होईल. पूर्ण जंगलात हे काम करण्‍यासाठी रू. 10 लाख लागतील असा अंदाज आहे.
 3. डोयाचापाडा-कासपाडा येथे विविध वनोपज प्रक्रिया केंद्र उभारण्‍यासाठी सुमारे रू. 7,00,000 लागणार आहेत. यात तेल काढण्‍यासाठी, फळे सुकवण्‍यासाठी, पत्रावळी बनवण्‍यासाठी, व पूड बनवण्‍यासाठी, व पॅकिंगसाठी लागणारी यंत्रे व या सर्वासाठी लागणारी शेड असे समाविष्‍ट आहे. यामुळे गावातून कच्‍चा माल बाहेर जाण्‍याऐवजी प्रक्रिया केलेले पदार्थ जातील. गावाच्‍या उत्‍पन्‍नात लक्षणीय वाढ होईल. हे केंद्र पथदर्शी असेल, येथून पुढे इतर गावातही अशी केंद्रे उभारण्‍याची मागणी तयार होईल.
 4. चळवळीचा विस्‍तार करण्‍यासाठी आणखी पूर्णवेळ कार्यकर्ते लागणार आहेत. सर्व कार्यकर्त्‍यांच्‍या मानधन व प्रवासाचा एकूण खर्च वर्षाला आठ लाख रूपये आहे. दोन मोटरसायकली व एका जीपचीही गरज आहे.
Advertisements

Published by vayamindia

Vayam is a voluntary movement for "inclusive and balanced" development. Its motto is "apne vikas ka apna abhiyan". Vayam means 'we' in Sanskrit. We focus on making leaders at roots, strengthening democracy, and conserving nature. We don't do charity, we empower!

Join the Conversation

4 Comments

 1. एक बारीक correction . देवळालीला ७.५ एकर जमिनीवर दोन वर्षांपूर्वी ३५०० झाडे लावण्यात आली आहेत. अर्थात हे काही फार महत्वाचं नाहीये 🙂

  1. धन्यवाद, सुमंत! आताच्या काळात एका झाडाने सुद्धा फरक पडतो, तिथे एक हजार
   झाडांचा फरक तर फार मोलाचा आहे. आपल्या admin team कडून हि चूक झाल्याबद्दल
   क्षमा असावी.
   On 18 Jan 2016 14:43, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

 2. मिलिंददादा, नमस्कार!
  मी माझ्या गावामध्ये रेशन कायदा व ईतर सेवाबद्दल जाग्रती करु ईच्छितो.
  पण त्याबद्दलची सखोल मायहिती माझ्याकडे नाहीये. त्यासाठी मला आपली मदत
  आणि मार्गदर्शन हवे आहे.
  धन्यवाद!

  On 1/15/16, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ”

  1. तुमच्या भावना कळल्या, पण अक्षरं कळत नाहीयेत. कृपया पुन्हा पोस्ट करा.
   On 19 Jan 2016 20:18, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

Leave a comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: