2016तील नवोन्मेष – वयम् वार्षिक वारी

सप्रेम नमस्कार
2016 हे नववे वर्षही नवोन्मेषाचे (म्हणजे innovationचे) ठरले. सादर आहे वार्षिक आतषबाजी…
‘ग्राम लक्ष्मी’ – महिला सरपंच प्रशिक्षण
आरक्षणामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायतीत सदस्य होण्याची आणि सरपंच होण्याचीही संधी मिळाली. या संधीसोबतच आव्हानेही आली. घरच्या आणि गावच्या पुरूषांचा दबाव, चेष्टा, विरोध या साऱ्याला तोंड देऊन ग्राम पंचायत चालवायची. पण त्या कामाचा अनुभवही नाही आणि प्रशिक्षणही नाही. त्यामुळे ही संधी आहे की शिक्षा – अशी भावना अनेक नवनिर्वाचित महिला सदस्यांची असते.
गावात समृद्धी आणण्याची जबाबदारी असलेल्या या सर्व ग्राम लक्ष्मी! पण अंगी शक्ती असूनही हतबल. यांचे शक्ती जागरण करण्याचा कार्यक्रम वयम् चळवळीने हाती घेतला आहे. जव्हार तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या महिला सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एक दिवसाच्या पहिल्या प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता – ग्रामसभेत कसे बोलावे! काही कायद्यांचे प्राथमिक प्रशिक्षणही झाले. या प्रशिक्षणात 18 सरपंच आणि 43 सदस्या सहभागी झाल्या. प्रथमच त्यांना समानशील मैत्रिणी मिळाल्या आणि वयम् चळवळीचा भक्कम आधारही मिळाला.
प्रथमच ग्राम पंचायतीचा जमाखर्च महिला सदस्यांनी वाचला. एका गावात सरपंच मॅडमनी सूत्रे हाती घेतल्यानंतरही ग्राम पंचायतीच्या बँक खात्यांवर मात्र आधीच्याच सरपंचबुवांचे नाव-सही होते. तेव्हाच तत्परतेने त्यांनी ग्रामसेवकाशी संगनमत करून खात्यांमधला बराच निधी खर्च करून टाकला. पण नवीन सरपंच बाईंनी वयम्’च्या मदतीने त्या खात्याचे सर्व पुरावे गोळा केले आणि ग्रामसभेत त्या दोघांनाही हिशोब द्यायला लावला. प्रत्यक्ष खर्च न केलेले पैसे ग्रामसभा सांगेल त्या बाबीवर खर्च करू असे आश्वासन जाहीरपणे द्यायला भाग पाडले.
tab_b-1831आदिवासी उपयोजना 5% निर्बंध निधीतून गावात करून घेण्याच्या कामांमध्ये – विहीरीवर महिलांना आंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी खोली बांधण्याचे काम – अनेक गावातल्या महिलांनी मंजूर करून घेतले.
वयम्’च्या रीतीनुसार पहिल्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना विचारण्यात आले, “तुम्हाला असे प्रशिक्षण हवे आहे का आणि त्यासाठी तुम्ही काय द्यायला तयार आहात?” थोडी चर्चा करून सर्व महिलांनी सांगितले की आम्हाला दर महिन्या-दोन महिन्याला असे प्रशिक्षण हवे. त्यासाठी आम्ही वर्गणी देऊ. पैसे नसले, तर मजुरीवर जाऊन 100 रू. कमवू आणि प्रशिक्षणाला येऊ.
‘ग्राम लक्ष्मी’ हा प्रकल्प असा सुरू झाला आहे. दोन प्रशिक्षण सत्रे पार पडली आहेत. प्रशिक्षणांच्या मधल्या काळात सहभागींच्या गावात जाऊन अडीअडचणीला हात देणारी वयम् लाईफलाईनही सुरू आहे.
आदिशक्ती – महिला गट बैठका
शासनाच्या ग्रामीण आजीविका मिशन मार्फत अनेक गावांमध्ये बचतगट झाले आहेत. या गटांमधून एकत्र येणाऱ्या महिलांचा गाव विकासात सहभाग असावा, यासाठी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संपर्क सुरू केला. ऑक्टोबर २०१६ पासुन जव्हार तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींमधील पाड्यांतील ७४ महिला स्वयंसहायता बचत गटांमार्फत ८३० महिलांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले.
त्यानंतर गरदवाडी, बाळकापरा, काळीधोंड, दाभेरी, दाभोसा अशा अनेक गावातल्या महिलांनी महिला ग्रामसभा झालीच पाहिजे असा आग्रह धरला. या सर्व गावांत प्रथमच महिलांच्या मोठ्या उपस्थितीत ग्रामसभा झाल्या. पेसामधला निधी किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे – याची लेखी माहिती द्या असा आग्रह महिलांनी धरला. “फार बोलायला लागली गं तू? कुठून अक्कल शिकून आलीस?” अशी पावतीही काही पुरूषांनी दिली. ग्रामसेवक ग्रामपंचायतीत हजर नसल्याने रोहयो काम मागणीचा अर्ज देण्यासाठी पाच गावातल्या स्त्रिया थेट तहसिलदारांकडे गेल्या आणि त्यांच्याकडून पोच घेऊन आल्या. नंतर काम न निघणे, पगार न मिळणे अशा तक्रारीसाठीही दोन गावातल्या महिला आपल्याआपण जव्हारला पोचल्या. तहसिलदार आणि बीडीओ यांना भेटल्या. आपली तक्रारही त्यांच्या कानावर घातली आणि रोजगार हमी कायद्या नुसार काम कसे मिळते हेही त्यांच्याकडून समजून घेऊन आल्या.
बाजाराव्यतिरिक्त जव्हारला इकडेतिकडे न फिरणाऱ्या बायांनी पंचायत समिती, तहसिलदार ऑफीसला येणे, कायदा समजून आख्ख्या गावाचे मागणी अर्ज भरून गावाला काम मिळवून देणे, गावाच्या तक्रारी संबंधित अधिकार्यांपुढे मांडणे असे एकेक पाऊल त्या पुढे सरकू लागल्या आहेत. बदलाला वेळ लागला तरी एकेक पाऊल भक्कम पडले पाहिजे, अशीच वयम्’ची धारणा आहे. क्रांती नव्हे संक्रांती (सम्यक् क्रांती) ही अशीच घडते.
सुग्रणींचा सुपोषण महोत्सव – रानभाजी स्पर्धा
यंदाच्या रानभाजी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा महिला आयोजित कार्यक्रम होता. बाळकापरा व सुतारपाडा गावातल्या 10 बचतगटांच्या 100 आदिवासी महिलांनी हा महोत्सव त्यांच्या गावात आयोजिला होता. तोरण-रांगोळ्यांनी सजलेला मंडप, ताज्या मोगऱ्याच्या वेण्यांचा घमघमाट, सालंकृत सुग्रणी, आणि द्रोणात सजून आलेल्या 70 प्रजातींच्या रानभाज्या. काहींची भजी, काहींच्या पातवड्या, काही फक्त शिजवलेल्या, तर काही मोहाच्या तेलावर खमंग परतलेल्या. अट एकच – शेतातल्या, परसातल्या भाज्या आणायच्या नाहीत, फक्त रानातून गोळा केलेल्या भाज्या. डोळे आणि जीभ दोन्ही दीपवणारा महोत्सव! बाळकापरा गावात जव्हार पंचायत समितीचे बीडीओ सुनील पठारे व आदिवासी सहज शिक्षण परिवारच्या कार्यकर्त्या साधनाताई दधीच सहभागी झाले. हातेरी-रूईचापाडा येथे 130 सुग्रणींसोबत जव्हारच्या तहसिलदार पल्लवी टेमकर व पं.स. कृषी अधिकारी संदेश दुमाडा; काळीधोंड येथे 30 सुग्रणींसोबत तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे व नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेच्या शोभनाताई भिडे; उंबरविहीर-साखरशेत येथे 51 सुग्रणींसोबत वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर व कुलदीप पाटकर तसेच जव्हार स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रवीण पेवेकर; दाभेरी येथे 38 सुग्रणींसोबत नाशिकचे उद्योजक ऋता व शैलेश पंडीत सहभागी झाले. याखेरीज वयम्’च्या मुंबई-पुणे-नाशिक-सेल्वास येथील मित्रमंडळींनीही आवर्जून चविष्ट हजेरी लावली.
या महोत्सवांमधून आदिवासी समाजाचे सुपोषणाचे पारंपरिक स्रोत सर्वांसमोर आले. जंगल आणि त्यातले अन्न टिकले, तर कुपोषण बऱ्याच अंशी कमी होईल. वयम् चळवळीने सातत्याने घेतलेली भूमिका ही आहे की – कुपोषण ही एक आधुनिक समस्या आहे. जंगलाचा ऱ्हास आणि आरोग्यविषयक जागृतीचा अभाव ही कुपोषणाची मुख्य कारणे आहेत. आदिवासी मुले व मातांना शासनाने व संस्थांनी फुकट खाऊ घालणे हा त्यावरील उपाय नाही.
डोंबिवलीतला एक शो – ‘टेटव, तारपा, आणि वयम्’
रानभाज्यांपासून वंचित असलेल्या बिचाऱ्या शहरातल्या आपल्या बांधवांना हा आनंद मिळावा म्हणून एक महोत्सव डोंबिवलीत झाला. 100 डोंबिवलीकरांनी यात भाग घेतला. आदिवासी समाज कुपोषित नाही, उलट सुपोषणाचा खजिनाच आमच्याकडे आहे अशी मांडणी यावेळी वयम्’च्या टीमने केली. रामदास, प्रकाश, दीपाली, मिलिंद यांनी आदिवासी संस्कृतीविषयी केलेले सादरीकरण, तारपा वादन व नाच, आणि 12 रानभाज्यांनी सजलेली डीलक्स थाळी अशी मेजवानी डोंबिवलीकरांना अत्यल्प शुल्कात चाखायला मिळाली.
रोजगार हमी जागृती आणि तात्काळ-दाखले शिबीर
वयम्’च्या टीममध्ये या वर्षी सात नवीन पूर्णवेळ कार्यकर्त्यांची भर पडली. 26 ग्राम पंचायतींतल्या 149 पाड्यांपर्यंत यांनी चळवळीचा विस्तार केला. पहिले पाऊल म्हणून या गावांमध्ये रोजगार हमी योजनेविषयी जागृतीचा कार्यक्रम सुरू झाला. 47 गावांमध्ये तरूण व महिलांच्या सक्रिय सहभागातून रो.ह.यो. जागृती मेळावे झाले. 1982 हजर. त्यातून रो.ह.यो. कायदा समजून ग्रामस्थांनी कामाची मागणी नोंदवली. 1001 जणांना पहिल्या टप्प्यात काम मिळाले. (अर्थातच त्यांचे स्थलांतर थांबले.) पुढील टप्प्यात 1430 जणांनी कामाची मागणी केली आहे. अनेक गावांना गेल्या 4 वर्षांत पहिल्यांदाच काम मिळाले. दर वर्षी मागेल त्याला 100 दिवस काम – ही शासनाची घोषणा असली, तरी चळवळीच्या धक्क्याशिवाय हे प्रत्यक्षात येत नाही.
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला – अशी अनेक कागदपत्रे मिळवण्यात लोकांना अडचणी येत असतात. त्यासाठी खेटे मारणे आणि लाच द्यावी लागणे हाही ताप असतो. जव्हारच्या तहसिलदारांच्या सहकार्याने तात्काळ दाखले देण्याचे शिबीर वयम्’च्या गावातल्या टीमने आयोजित केले. शिबिराचा सर्व खर्च (मंडप, खुर्च्या, स्पीकर इ.) लोकांनी वर्गणी काढून भागवला. गावातल्या युवकांनी प्रत्येक कुटुंबाची कागदपत्रे तपासून, फॉर्म भरून, पुरेशा झेरॉक्स, फोटो आधीच तयार करून ठेवले होते. देहरे, हातेरी, न्याहाळे, सावरपाडा या गावांमध्ये अशी शिबिरे झाली. 531 नागरिकांना विविध दाखले विनाकटकट मिळाले.
बिन.बुका.या.शिका आणि धडपड प्रयोगशाळा
शाळेत मिळणारे शिक्षण पुरे पडत नाही. आणि त्यात आता शाळा डिजिटल करून मुलांना ‘अधिक बघे’ करण्याचा चंग सरकारने बांधला आहे. परिसरात सहजसोपे विज्ञान घडत असते, त्यातून शिकण्याऐवजी मुलांनी प्रोजेक्टरच्या पडद्याकडे बघत बसणे असे शाळांमध्ये चालले आहे. पुस्तकांपलिकडेही शिक्षण असते, हे नावातच सांगणारा ‘बिन बुका या शिका’ हा प्रकल्प यंदा पाच गावांमध्ये सुरू झाला. सुमारे 5,000 रू. ची खेळणी या गावांमधल्या एका घरात ठेवली. मुलांना त्या खेळणी वापराचे नियम बनवायला सांगितले. त्यावर देखरेखीसाठी मुलांनीच आपले प्रतिनिधी निवडले. कधीच खेळणी न मिळालेल्या या मुलांनी ही दौलत नीट सांभाळली आहे. मुले विध्वंसक असतात, त्यांना काय जमणारै – अशा सर्व आरोपांना मुलांनीच उत्तर दिले आहे. 90% खेळणी व्यवस्थित आहेत. जंगल, पाणी, अशा सामुदायिक संपदा पुढे या मुलांनाच सांभाळायच्या आहेत. त्याचीच ही पायाभरणी आहे.
या मुलांनी गावात स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबीर असे उपक्रमही घेतले आहेत.
ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये प्रयोगशाळा ‘नही के बराबर’ असतात. सूक्ष्मदर्शक, परीक्षा नळ्या मुलांनी फोडू नयेत, म्हणून कपाटात असतात. अनेक प्रयोग दुरून बघण्यावर समाधान मानावे लागते. वयम् टीमने एक प्रयोगशाळा तयार केली. ज्यात 6वी ते 10 वीचे सर्व प्रयोग करता येतील असे साहित्य आहे. सूक्ष्मदर्शक, परीक्षानळ्या, रसायने तर आहेतच, पण अनेक प्रयोगांचे किट जुन्या सीडी, बिस्लेरी बाटल्या, स्ट्रॉ, यांपासून तयार केलेले आहेत. असा एकेक किट आणि स्टीलचे कपाट पाच शाळांना भेट म्हणून दिले आहे. या भेटीचे वेळी मुलांना हे सर्व साहित्य दाखवून ते सांभाळण्याची मुलांचीच व्यवस्था लावून दिली आहे. जे किट साध्या साहित्यातून बनले आहेत, ते किट स्वतःच तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची एकत्र कार्यशाळा होणार आहे. यातले काहीही पडले-फुटले तरी हरकत नाही, भरपूर वापरावे – म्हणूनच यांना ‘धडपड प्रयोगशाळा’ असे नाव दिले आहे.
जीवन शिक्षण कार्यक्रमाचे दुसरे वर्ष
०९ जुलै २०१६ रोजी या कार्यक्रमाला मेढा व आयरे येथील हायस्कूलमध्ये सुरूवात झाली. या कार्यक्रमात प्रभा हिरा गांधी विद्यालय, मेढा येथील एकूण ७० विद्यार्थी तसेच छत्रपती शाहू विद्या निकेतन, आयरे येथील एकूण ६३ विद्यार्थी सहभागी आहेत. हा कार्यक्रम इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चालतो. नोव्हेंबरमध्ये दोन्ही शाळांमध्ये कमाल-धमाल शिबीर घेण्यात आले. त्यात बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांची जत्रा होती.
वृक्षवल्ली सोयरीक अभियान (टप्पा १)
एप्रिल २०१६ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत वृक्षवल्ली सोयरीक अभियान कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार पडला. या अभियानामध्ये एकूण १४ गावं सहभागी झाली. त्यापैकी १० गावांतील १०३ शेतकरी वैयक्तिकरीत्या सहभागी झाले तर ४

गावांपैकी 1 ग्राम पंचायत, 2 पाडा सभा, आणि १ जि. प. शाळा अशा सर्वांनी सहभाग घेतला. सर्वांनी मिळून 21हजारहून अधिक झाडे लावली आणि ही झाडे जगवण्याची जबाबदारीही घेतली. या कार्यक्रमासाठी वनविभागाचे, तसेच ढाढरी गावातील बचतगटाच्या नर्सरीचे, व आयसीआयसीआय् बँकेचे सहकार्य लाभले. या अभियानांतर्गत दापटी व कोगदा या गावांमध्ये २ सामुहिक शेततलाव (३२×३५×३ मी. तसेच ३१×२७×३ मी.) झाले, तर सर्व सहभागी शेतकऱ्यांचे शेतात मिळून १२४ जलकुंड (३×३×१ मी.) असे जलस्रोत विकसित करण्यात आले. 124 जलकुंडांत मिळून 7लाख 75 हजार लिटर पाणी साठले आहे. हे सर्व पाणी ही झाडे जगवण्यासाठी वापरले जाईल.
जनवनसंवर्धन
जून २०१६ मध्ये सामुहिक संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत वन विभागाच्या निधीतून डोयाचापाडा ग्रामसभेने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या नावे १० सौर वाळवण यंत्रे घेतली आहेत. या यंत्रांद्वारे आजवर १२० किलो टॉमॅटो वाळवून झाला आहे. याखेरीज यात गवती चहा, कोहळा, लाल भोपळा, शेवगा पाला – असेही वाळवण व विक्री चालू आहे. याच प्रकारे कोकणपाडा ग्रामसभेने शासनाच्या मानव विकास कार्यक्रम निधीतून 10 सौर वाळवण यंत्रे घेतली आहेत. दोन्ही पाड्यांचा मिळून बाजार-जोडणीचा प्रयत्न चालू आहे. यासाठी ग्राहक शोधही चालू आहे. पुढील काळात येथे वनोपज (जंगलातील फळे-फुले) वाळवण व विक्री असा उद्योग उभा रहावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. शहरांतून यासाठी मित्र-भागीदार पाहिजे आहेत. व्यवसाय भागीदार व घाऊक ग्राहक यांनी अवश्य संपर्क करावा. vayamindia@gmail.com
कोकणपाडा ग्रामसभेच्या राखीव रानाला कुंपण घालण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. आपले जंगल किती व कुठपर्यंत आहे हे गावातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरूषांना कळावे, यासाठी एक नवी रीत कोकणपाड्याने सुरू केली. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘वनपरिक्रमा’ झाली. सर्वांनी शेतकामातून सुट्टी घेतली आणि वाद्ये घेऊन जंगलाला एक फेरी मारली. सर्वांचे जेवणही एकत्र झाले. वर्षातून पाच ते सहा मंगळवार श्रमदानाचे ठरले आहेत. त्याप्रमाणे सर्व कुटुंबांनी जंगलात काम केले.

आमचा विकास, आमचा आराखडा
केंद्र सरकारने वित्त आयोगाचा निधी थेट ग्राम पंचायतींना देतानाच या निधीचा वापर ग्रामस्थांनी केलेल्या आराखड्यानुसारच झाला पाहिजे असे निर्देश दिले होते. आपल्या कार्यकर्त्यांनी गाव जागर सुरू केलाच होता, त्यात एक नामी संधी चालून आली. आराखड्याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना देण्यासाठी शासनाने वयम्’च्या कार्यकर्त्यांची निवड केली. या कार्यकर्त्यांनी शासनाचे प्रशिक्षक या नात्याने 50 ग्राम पंचायतींमधील ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.
या सोबत पेसा अंतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या आदिवासी उपयोजना 5% निधीचा आराखडा करण्यातही या कार्यकर्त्यांनी गावात माहिती दिली. नाविन्यपूर्ण कामांची यादी करून एक प्रकारचे गाईड लोकांना सुपूर्द केले.

वयम् चळवळीच्या 2016मधील कामाचा हा लेखाजोखा सर्व मित्र-हितचिंतक-देणगीदार यांना आनंदवाट्यासाठी सादर. रथसप्तमीच्या शुभेच्छा.
सामान्य प्रजेच्या बलाने बलशाली होणाऱ्या प्रजासत्ताकाच्या सर्वांना शुभेच्छा!
– टीम वयम्

Advertisements

Published by vayamindia

Vayam is a voluntary movement for "inclusive and balanced" development. Its motto is "apne vikas ka apna abhiyan". Vayam means 'we' in Sanskrit. We focus on making leaders at roots, strengthening democracy, and conserving nature. We don't do charity, we empower!

Join the Conversation

2 Comments

  1. I am aware of VAYAM activities and get info through your posts.I would like to visit your working gr/centers.

Leave a comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: